चेन्नई - टी-२० मालिकेत भारतीय संघाविरुद्ध सपाटून मार खाल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ एकदिवसीय मालिकेच्या तयारीला लागला आहे. उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार असून पहिला सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार आहे. दरम्यान, या मैदानावर विंडीज संघाचा इतिहास पाहता भारतीय संघ पाहुण्या संघावर नेहमी वरचढ ठरला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात पहिला एकदिवसीय सामना उद्या (रविवारी) रंगणार आहे. या सामन्याला दुपारी १:३० वाजता सुरुवात होईल. चेन्नईच्या मैदानात भारतीय संघ मागील ३० वर्षांमध्ये विंडीज विरुध्द फक्त एकदाच पराभूत झाला आहे. मात्र, सध्याचा भारतीय संघ पाहता पाहुण्या संघाला विजय मिळविणे कठीण जाणार आहे.
एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये उभय संघात आजघडीपर्यंत ४ सामने झाली आहेत. यात भारतीय संघाने ३ सामने जिंकले आहेत. तर विंडीजला एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या मैदानावर झालेल्या २१ सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ तब्बल १३ वेळा विजयी ठरला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात आतापर्यंत १३० सामने झाली आहेत. यात भारतीय संघाने ६२ तर विंडीजनेही ६२ सामने जिंकले आहेत. तर राहिलेल्या ६ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. दरम्यान, या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असे तज्ञांचे मत असून येथे फलंदाजी करणे कठीण जाईल.
- भारताचा संभाव्य संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर.
- वेस्ट इंडीजचा संभाव्य संघ -
- केरॉन पोलार्ड (कर्णधार ), सुनील एंब्रिस, शाय होप, खेरी पियरे, रोस्टन चेज, अल्जारी जोसेफ, शेल्डन कॉटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.