महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताचा विंडीजवर १०७ धावांनी दणदणीत विजय; कुलदीप यादवची हॅटट्रीक, मालिकेत १-१ ने बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडीज संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानात रंगला. हा सामना भारताने १०७ धावांनी जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

india vs west indies : live score of india vs west indies second odi from Visakhapatnam
India Vs West Indies, २nd ODI : भारताचे विंडीजसमोर धावांचा डोंगर, रोहित-राहुलची द्विशतकी भागिदारी

By

Published : Dec 18, 2019, 1:11 PM IST

Updated : Dec 19, 2019, 11:45 AM IST

विशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान सुरू असलेला मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी केली. विजयासाठी भारताने वेस्ट इंडीजसमोर ३८८ धावांचे आव्हान ठेवले होते. विंडीजचा सगळा संघ 280 धावांतच तंबूत परतला. फिरकीपटू कुलदीप यादवने कारकिर्दीतील दुसरी हॅटट्रीक नोंदवली.

शाय होप (७८) आणि निकोलस पूरन (७५) यांनी धडाकेबाज खेळी करत काही काळ सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा जास्त काळ टिकाव लागला नाही. ४३.३ षटकात विंडीजचा संघ सर्वबाद झाला. कुलदीप यादव आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

कुलदीप यादवची हॅट्रिक

यापुर्वी, विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडीजसाठी महाग ठरला. रोहित शर्मा (१५९) आणि केएल राहुल (१०२ ) यांची द्विशतकी सलामी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतची ताबडतोड खेळी याच्या जोरावर भारताने विंडीज समोर धावांचा डोंगर उभारला. भारताने निर्धारीत ५० षटकात ५ बाद ३८७ धावा केल्या.

भारतीय सलामीवीर जोडी रोहित आणि राहुल यांनी ३६ षटकात २२७ धावांची सलामी दिली. केएल राहुल १०४ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारासह १०२ धावांवर बाद झाला. त्याला अल्झरी जोसेफने रोस्टन चेसकरवी झेलबाद केले. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर आलेला भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा 'फेल' ठरला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. पोलार्डने त्याला माघारी धाडले.

एका बाजू पकडून रोहित शर्माने आक्रमक खेळी कायम ठेवली. त्याने श्रेयश अय्यर सोबत झटपट अर्धशतकी भागिदारी केली. दीडशतक पूर्ण झाल्यानंतर रोहितने धावगती वाढवण्याच्या उद्देशाने फटके मारण्यास सुरूवात केली. तेव्हा शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर झेल घेत शाय होपने त्यांची झंझावती खेळी संपुष्टात आणली. रोहितने १३८ चेंडूत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १५९ धावा केल्या.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अय्यर आणि पंत जोडीने विंडीज गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी वेगाने धावा जमवल्या. दोघे स्थिरावले असे वाटत असताना, पंतला कीमो पॉलने पूरम करवी झेलबाद केले. पंतने १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर अय्यरही ३२ चेंडूत ५३ धावांवर बाद झाला. त्याला कोल्ट्रेलने माघारी धाडले. विंडीजकडून शेमरॉन कोट्रोलने २, कीमो पॉल, अल्झरी जोसेफ आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Last Updated : Dec 19, 2019, 11:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details