चेन्नई - श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजसमोर २८८ धावांचे लक्ष्य ठेवले. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताची सुरुवात खराब झाली. तेव्हा अय्यर (७०) आणि पंत (७१) यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला.
केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा विराट कोहलीसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. भारताची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या २१ असताना, सलामीवीर लोकेश राहुल ६ धावांवर बाद झाला. त्याला कोट्रेलने हेटमायरकरवी झेलबाद केले. राहुल पाठोपाठ भारताला विराटच्या रूपाने दुसरा धक्का बसला. कोट्रेलनेच विराटला (४) त्रिफाळाचित करत माघारी धाडले.
विराट बाद झाल्यानंतर भारताची अवस्था २ बाद २५ अशी झाली. तेव्हा सलामीवीर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संघाची धावसंख्या ८० असताना रोहित (३६) चुकीचा फटका मारून बाद झाला. तेव्हा श्रेय्यस अय्यर आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतक झळकावले. श्रेय्यस अय्यरने ८८ चेंडूत ७० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तो जोसेफच्या गोलंदाजीवर पोलार्डकडे सोपा झेल देऊन बाद झाला.
दुसरीकडे ऋषभ पंतने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. त्याने धावगती वाढवण्याच्या उद्देशाने मारलेला फटका हेटमायरच्या हातात विसावला आणि त्याची खेळी संपुष्टात आली. त्याने ६९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७१ धावा केल्या. पंत बाद झाल्यानंतर केदार जाधवने ३५ चेंडूत ४० धावांची वेगवान खेळी केली. केदारनंतर भारतीय संघाला गळती लागली आणि भारतीय संघ निर्धारित ५० षटकात ८ बाद २८७ धावा करु शकला. विंडिजकडून कोट्रेल, कीम पॉल आणि अल्झरी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर पोलार्डने एक गडी बाद केला.