विशाखापट्टणम- भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना उद्या (बुधवार) रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधण्यासाठी खेळ करेल, तर दुसरीकडे विंडीजचा संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात संघाला चांगली सलामी मिळावी, यासाठी दोघांना चांगला खेळ करावा लागेल. तिसऱ्या क्रमाकांवर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी उतरेल. विराट पहिल्या सामन्यात अवघ्या ४ धावांवर बाद झाला. यामुळं दुसऱ्या सामन्यात त्यांची कामगिरी उंचावणं गरजेचं आहे.