मुंबई - भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्याआधी वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन एलेनची दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही. यामुळे तो वानखेडे मैदानावरील निर्णायक सामना खेळू शकणार नाही.
वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी सांगितलं की, 'फॅबियनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.'
दरम्यान, फॅबियन एलेनला अफगाणिस्तान विरुद्धच्या लखनऊ येथील सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे तो भारताविरुद्धचे दोनही सामने खेळू शकलेला नव्हता.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ६ गडी राखून जिंकला. तर दुसरा सामना वेस्ट इंडीज संघाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरचा सामना मुंबईत होणार आहे.