नवी दिल्ली - वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी विजय मिळवत टेस्ट चॅम्पियनशिपचा विजयी शुभारंभ केला. मात्र, या सामन्यात भारतीय यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या ऋषभ पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो पहिल्या डावात २४ धावांवर बाद झाला तर, दुसऱ्या डावात केवळ ७ धावांवर बाद झाला. यामुळे पंतवर चौफेर टीका होत आहे.
भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या कसोटीत ऋषभ पंतला वगळून भारताने यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाची निवड करावी, अशी मागणी केली आहे. सय्यद किरमाणी हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक मानले जातात.
ऋषभ पंतला सध्या सुरू असलेल्या विंडीज दौर्यावर चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच खेळपट्टीवर वेळ घालवल्यानंतर तो खराब फटका मारून बाद होण्याच्या सवयीमुळे त्याच्यावर टीकाही झाली आहे. त्यामुळे दुखापतीमुळे मागील काही काळ संघातून बाहेर रहाव्या लागलेल्या साहाला पुढील कसोटीत संधी मिळायला पाहिजे, असे किरमाणी यांना वाटते.