इंदूर -भारत आणि श्रीलंका टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर मैदानावर रंगणार आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ या मैदानावर समोरासमोर उभे ठाकतील.
हेही वाचा -'दोस्ती तर आहे आमची राईट, पण मॅटवर गेल्यावर चुरशीची होईल फाईट'
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह यांच्याकडे गुवाहाटीच्या सामन्यात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, ही प्रतिक्षा आता इंदूरच्या सामन्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने आपली निवड सिद्ध केली. आता हाच फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर धवन पुढे सुरू ठेवू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दुसऱ्या बाजूला, अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज संघात आल्याने लंकेची ताकद नक्कीच वाढली आहे. मलिंगासोबतच निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, धनंजय डी'सिल्वासारखे खेळाडूही संघासाठी बहुमूल्य योगदान देऊ शकतात.