पुणे - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये दुसऱ्या कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. दरम्यान, भारतीय संघाने, मयांकच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवसाअखेर ३ बाद २७३ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेसोबत कर्णधार विराट कोहली अर्धशतक झळकावत नाबाद आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात त्रिशतकी सलामी देणारी रोहित शर्मा आणि मयांकची जोडी यशस्वी ठरली नाही. संघाची धावसंख्या २५ असताना, रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात दोनही डावात शतकं झळकावल्याने रोहितकडून अशाच खेळीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कगिसो रबाडाने त्याला १४ धावांवर माघारी धाडले.
सलामीवीर रोहित शर्मा परतल्यानंतर, मयांक-पुजारा जोडीने खेळपट्टीवर जम बसवत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या गड्यासाठी दोन्ही फलंदाजांनी १३८ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपले अर्धशतक पूर्ण केले.