हॅमिल्टन- न्यूझीलंड एकादशविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघाने शानदार वापसी केली. भारताचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. तेव्हा दुसऱ्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी नोंदवत न्यूझीलंडला २३५ धावांमध्ये गुंडाळले. भारताला पहिल्या डावात २८ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी ९ गडी बाद केले. तर सर्वाधिक ३ बळी मोहम्मद शमीने घेतले.
हेन्री कुपर (४०), राचिन रवींद्र (३४), कर्णधार मिचेल (३२) आणि टॉम ब्रुसच्या ३१ धावांच्या जोरावर न्यूझीलंडला २०० आकडा पार करता आला. भारताकडून शमीने ३ तर बुमराह, उमेश यादव आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २-२ विकेट घेतले. रविचंद्रन अश्विनने एक गडी बाद केला.
भारताने दुसऱ्या दिवसाअखेर बिनबाद ५९ धावा केल्या आहेत. सलामीवीर मयांक अगरवाल (२३) आणि पृथ्वी शॉ (३५) नाबाद खेळत आहेत. दोन्ही डावात मिळून भारताकडे ८७ धावांची आघाडी झाली आहे.
भारताच्या पहिल्या डावात मयांक अगरवाल (१), पृथ्वी शॉ (०) आणि शुभमन गिल (०) हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरले. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताची अवस्था ३ बाद ५ अशी झाली होती. अजिंक्य रहाणेसुद्धा १८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विहारी आणि पुजारा यांनी पाचव्या गड्यासाठी १९५ धावांची भागीदारी केली. पुजारा ९२ धावांवर बाद झाला.