हॅमिल्टन - टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना १०१ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह शतक पूर्ण केले. दरम्यान, श्रेयसने या शतकासह चौथ्या क्रमाकांचा तिढा सोडवला आहे.
मागील काही वर्षापासून भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चौथा फलंदाज हा डोकेदुखीचा विषय ठरला होता. श्रेयसने हा जटील प्रश्न सोडवला. २०१९ च्या विश्व करंडकातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण चौथा क्रमांकाचा फलंदाज हाही होता. श्रेयसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत संघात स्थान मिळवले आणि दमदार कामगिरी करत भारताच्या मुख्य संघात स्थान पक्के केले.
२०१५ पासून आतापर्यंत चौथ्या क्रमाकांच्या फलंदाजांनी केवळ ४ शतके झळकावली आहेत. यात २०१६ मध्ये मनीष पांडेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळताना शतकी खेळी केली होती. त्यानंतर युवराज सिंहने २०१७ मध्ये संघात वापसी करताना शतक झळकावले होते. २०१८ मध्ये अंबाती रायडूने वेस्ट इंडीजविरुद्ध शतकी खेळी केली होती. आता श्रेयस अय्यरने शतक ठोकले आहे.