माउंट माउंगनुई - भारताने पाच टी-२० सामन्याच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूजीलंडचा ७ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिका ५-० ने आपल्या खिशात घातली. या मालिकेत भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यावर दमदार कामगिरी केली. दरम्यान, अंतिम सामन्यात भारताच्या संजू सॅमसनने सीमा रेषेवर केलेली अफलातून फिल्डिंग सद्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १७ अशी झाली. तेव्हा अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. टेलरने ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मिड विकेटच्या दिशने चेंडू टोलावला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, हे जवळपास नक्की होते. पण संजूने धावत येत हवेत उडी मारली आणि चेंडू पकडला. पण, त्याला आपला तोल सावरता आला नाही. त्याने सीमारेषेच्या बाहेर पडण्याआधी चेंडू आत टाकला.