हॅमिल्टन- भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अनिर्णीत राहिला. तिसऱ्या दिवशी भारताने ४ बाद २५२ धावा केल्या होत्या. यानंतर पंचांनी हा सामना अनिर्णीत झाल्याचे घोषित केले.
दुसऱ्या दिवसाअखेर भारताने बिनबाद ५९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या जोडीने पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या सत्राच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के बसले. शॉ ३९ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शुभमन गिलही ८ धावांवर माघारी परतला.
मयांक अगरवाल आणि ऋषभ पंत या जोडीने १३४ धावांची भागिदारी करत भारताला दोनशेपार केले. पंत ७० धावांवर बाद झाला. यानंतर मयांक ८१ धावांवर रिटायर्ड आउट झाला. रिद्धमान साहा (३०) आणि रवीचंद्रन अश्विन १६ धावांवर नाबाद राहिले.
तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. तेव्हा दुसऱ्या दिवशी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी दमदार कामगिरी नोंदवत न्यूझीलंडला २३५ धावांमध्ये गुंडाळले. भारताला पहिल्या डावात २८ धावांची आघाडी मिळाली.