मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी १६ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. तर श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० मालिकेत विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघच जवळपास कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, या संघात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. तर रोहित शर्माची संघात वापसी झाली आहे.
महेंद्रसिंह धोनी -
विश्व करंडक स्पर्धेनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, तो न्यूझीलंडच्या दौऱ्यात भारतीय संघात दिसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, ती फोल ठरली आहे. बीसीसीआयने टी-२० च्या १६ सदस्यीय संघात धोनीला स्थान दिलेले नाही.
दरम्यान, धोनी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत नसणार हे स्पष्ट झाले असून त्याची मैदानावरिल 'एन्ट्री' लांबली आहे.
दुखापतीतून सावरलेला हार्दिक पांड्याची संघात वापसी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र, तो फिटनेस चाचणीत 'फेल' ठरला. यामुळे त्याचीही निवड संघात करण्यात आलेली नाही.
न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २४ जानेवारीला उभय संघातील पहिला टी-२० सामना ऑकलॅडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.