वेलिंग्टन- भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग ८ व्या विजयाच्या उद्देशानं मैदानात उतरेल. यंदा भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान आहे. अनुभवी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत विराट अॅन्ड कंपनीची धुरा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा आणि स्वत: विराटवर असणार आहे. तर दुसरीकडे संघासाठी सलामीवीर जोडी चिंतेचा विषय आहे. विराटने मयांक आणि पृथ्वी शॉ सलामीला येतील, याचे संकेत दिले आहे. यामुळे शुभमन गिलचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडले आहे. इशांत शर्माची संघात वापसी झाल्याने भारतीय गोलंदाजी मजबूत झाली आहे.
असा आहे टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्ड -
कसोटीत भारताचा न्यूझीलंडविरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. दोन्ही देशात आतापर्यंत ५७ कसोटी सामने खेळली गेली आहेत. यात भारताने २० तर न्यूझीलंडने १० सामने जिंकली आहेत. तर राहिलेले २१ सामने अनिर्णीत आहेत. पण भारताचा न्यूझीलंडमध्ये खेळताना रेकॉर्ड सामन्य आहे. उभय संघात न्यूझीलंडमध्ये २४ कसोटी सामने झाले आहेत. यात भारताने ५ तर न्यूझीलंडने ८ विजय मिळवले आहेत. तर राहिलेले १० सामने अनिर्णीत आणि एक सामना रद्द झाला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शेवटची कसोटी मालिका २०१७ मध्ये झाली होती. यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिल्या कसोटी भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी वृद्धीमान साहा करु शकतो. कारण ऋषभ पंतला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. शेवटच्या डावातील अर्धशतक वगळता त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. यामुळे साहाला अंतिम संघात स्थान मिळू शकते.