माऊंट माउंगानुई - भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारताने अखेरच्या पाचव्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत न्यूझीलंड संघाला ५-० ने व्हाईटवॉश दिला. न्यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली नाही. न्यूझीलंड पहिले तीन फलंदाज अवघ्या १७ धावांमध्ये परतले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा अनुभवी रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. तेव्हा नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.
सेफर्ट अर्धशतक झळकावून माघारी परतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी मैदानात फक्त हजेरी लावण्याचे काम केले. एका बाजूने गडी बाद होत असताना रॉस टेलरने एक बाजू पकडून धरत आपले व्यक्तिगत अर्धशतक झळकावले. भारताच्या विजयात टेलर आडकाठी घालणार असे दिसताच, सैनीने त्याला माघारी धाडले.
ईश सोढीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचले पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावा करता आल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.