ऑकलंड - न्यूझीलंड संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामना २२ धावांनी जिंकला. न्यूझीलंडचे २७४ धावांचे आव्हान भारतीय संघाला पेलवले नाही. भारताचा संपूर्ण संघ ४८.३ षटकात सर्वबाद २५१ धावा करु शकला. भारताकडून श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, नवदीप सैनीने चांगली फटकेबाजी करत झुंज दिली. पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. दरम्यान, न्यूझीलंडने तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडच्या २७४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. मयांक अगरवाल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. त्याला बॅनेटने टेलरकरवी झेल बाद केले. मयांक पाठोपाठ पृथ्वी शॉ ही माघारी परतला.
२४ धावांवर त्याचा जेमिन्सनने त्रिफाळा उडवला. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही निराशा केली. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. एक बाजू पकडून श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले.
अय्यर-जडेजा ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असे वाटत असताना, अय्यर बॅनेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ५७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. अय्यर बाद झाल्यानंतर जडेजाने पहिले शार्दुर ठाकूरसोबत छोटी भागिदारी केली.
शार्दुल बाद झाल्यानंतर जडेजा-नवदीस सैनी या जोडीने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या. मात्र अखेच्या षटकात फटकेबाजीच्या प्रयत्नात सैनी (४५) बाद झाला. त्यानंतर चहलही (१०) धावबाद झाला. जडेजा मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि भारताने हा सामना गमावला. जडेजाने ५५ धावांची खेळी केली.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी ९३ धावांची सलामी दिली. १७ व्या षटकात चहलने निकोलसला (४१) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
गुप्टील-ब्लंडल या जोडीने न्यूझीलंडला शंभरी पार करुन दिले. दोघांनी ४९ धावांची भागिदारी केली. या दरम्यान गुप्टीलने आपले अर्धशतक पूर्ण केले. ही भागिदारी शार्दूल ठाकूरने संपुष्टात आणली. नवदीप सैनीने ब्लंडलचा (२२) झेल घेतला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूरच्या अचूक फेकीवर गुप्टील (७९) धावबाद झाला.
गुप्टील बाद झाल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केली. कर्णधार टॉम लाथम, जिम्मी नीशम, ग्रँडहोम आणि मार्क चॅपमन ठराविक अंतराने बाद झाले.
अनुभवी रॉस टेलरने तेव्हा एक बाजू पकडत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कायल जेमिन्सनच्या (नाबाद २५) साथीने फटकेबाजी करत न्यूझीलंडला २७३ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युझवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.