अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहली अष्टपैलू शार्दुल ठाकूरवर चिडलेला पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडसमोर विजयासाठी १५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे २ गडी बाद झाल्यानंतर सलामीवीर जोस बटलर व जॉनी बेअरस्टोने डाव सावरला.
इंग्लंडच्या डावात १२ व्या षटकात घडली 'ही' घटना
इंग्लंडच्या डावाच्या बाराव्या षटकात युझवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेला चेंडू बेअरस्टोने स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला. तेव्हा यष्टीरक्षक ऋषभ पंत चेंडूच्या मागे गेला. मात्र, फाईन लेगला उभ्या असलेल्या शार्दुल ठाकूरने धावत येऊन तो चेंडू खेळपट्टीकडे फेकला. त्याने केलेला थ्रो नॉन स्ट्राइक एंडला असलेल्या चहलकडे जायला हवा होता. मात्र, तो चेंडू खेळपट्टीच्या मधोमध टप्पा पडत कव्हर्समध्ये उभ्या असलेल्या विराटच्या हाती गेला. त्यानंतर, विराट शार्दुलवर कमालीचे नाराज दिसला व त्याच्याकडे पाहून रागात काहीतरी पुटपुटला.