अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. उभय संघातील पहिले दोन सामने चेन्नईत पार पडले. यात पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला. तिसरा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून टीका-टिप्पणी सुरू आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल होती, असे वारंवार सांगितलं जात आहे. यावरून भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने टीकाकारांना सुनावलं आहे.
माध्यमाशी बोलताना रोहित म्हणाला, 'चेपॉकची खेळपट्टी दोन्ही संघांसाठी एकसारखीच बनवण्यात आली होती. त्यामुळे वारंवार हा विषय का चर्चिला जातोय, काय माहिती. दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळले. भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. त्यामुळे यात कोणताही बदलाव करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक संघ होम अॅडव्हान्टेज घेतो.'
आम्ही भारताबाहेर खेळण्यासाठी जातो तिथे आमचा विचार कोण करत नाही. त्यामुळं आपणही कोणाबाबत विचार करण्याची गरज नाही. आपल्या संघाला जशा प्रकारची खेळपट्टी हवी ती आपण तयार करायला हवी. यालाच होम अॅडव्हान्टेज म्हणतात. अन्यथा आयसीसीला सर्वच मैदानावर एकसारख्या खेळपट्ट्या तयार करण्यास सांगायला हवे, असे देखील रोहित म्हणाला.