मुंबई - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करुन बॉर्डर-गावसकर चषकावर नाव कोरले. चार सामन्याची मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर भारतासमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधीच इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन याने भारतीय संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.
केविन पीटरसनने एक ट्विट केले आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याने हे ट्विट खास हिंदीतून केले आहे. यातून त्याने भारतीय संघाला इशारा दिला आहे.
भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. परंतु खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे. त्याला तुम्हाला तुमच्या घरात पराभूत करावे लागणार आहे. सतर्क रहा. दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध राहा, अशा आशयाचे ट्विट पीटरसनने केले आहे. ट्विटच्या पीटरसनने हसण्याचे इमोजीही जोडले आहेत.