अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंड फलंदाजांची शिकार केली. भारताच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसाअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीने भारताचा डाव सावरला.
भारताविरूद्धच्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय सलामीवीरांनी संथ सुरूवात केली. जोफ्रा आर्चरने भारतीय संघाला पहिला धक्का दिला. त्याने शुबमन गिलला जॅक क्रॉलीकडे झेल देण्यास भाग पाडले. गिलने ५१ चेंडूत ११ धावा केल्या. गिल पाठोपाठ चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण रोहितने विराटच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने ६१ चेंडूत अर्धशतक झळकावले. रोहित आणि विराटची जोडी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना, विराट जॅक लीचच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. त्याने २७ धावा केल्या. रोहित ५७ तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे१ धावेवरखेळत होता.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार रूटचा हा निर्णय अंगलट आला. आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्लीला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो मैदानात आला. त्याला अक्षर पटेलने शून्यावर माघारी धाडले. इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला. पण त्यानंतर कर्णधार जो रूट आणि जॅक क्रॉली या दोघांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केले. यानंतर अश्विनने कर्णधार जो रूटला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रुटने १७ धावा केल्या. रुट पाठोपाठ क्रॉली देखील बाद झाला. ५३ धावांवर अक्षर पटेल याने त्याला पायचित केलं.
इंग्लंडची अवस्था चहापानापर्यंत २७ षटकात ४ बाद ८१ अशी झाली होती. चहापानानंतर देखील इंग्लंडची गळती थांबली नाही. मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप (१), बेन स्टोक्स (६) अपयशी ठरले. यानंतर इंग्लंडची अवस्था आणखी बिकट झाली. इंग्लंडचे शेपूट अश्विन-पटेल जोडीने गुंडाळले. अक्षर पटेलने ३८ धावांत ६ गडी बाद केले. तर आर अश्विनने २६ धावांत ३ गड्यांना तंबूत धाडलं. १०० वा सामना खेळणाऱ्या इशांतला एक गडी बाद करता आला.