मुंबई - भारतीय संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमार यादवला बरीच मोठी प्रतिक्षा करावी लागली. अखेरीस त्याच्या प्रतिक्षेचे फळ त्याला मिळाले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमारची निवड भारतीय संघात करण्यात आली. सूर्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण सूर्याला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. सूर्याने या सामन्यात क्षेत्ररक्षणात कमाल दाखवत जॉनी बेअरस्टोचा झेल टिपला. या दरम्यान, सूर्याने पदार्पण केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सूर्यकुमारला दुसऱ्या सामन्याला सुरूवात होण्याआधी भारतीय संघाची कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. या क्षणाचे तसेच सामन्यात क्षेत्ररक्षण करतानाचे फोटो ट्विट करत सूर्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात सूर्याने त्याच्या कुटुंबियांचे आभार मानले आहेत.
माझे आई-वडील, ताई, बायको, प्रशिक्षक आणि इतर सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या क्षणासाठी आम्ही सर्वांनी वाट पाहिली. आमचे सर्वाचे एकत्र स्वप्न पूर्ण झाले, अशा आशयाचे ट्विट सूर्याने केले आहे.