चेन्नई - कर्णधार जो रूटचे दणकेबाज द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके, यांच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या दोन सत्रात पाहुण्या संघाने निर्विवादीत वर्चस्व राखले. शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी झटपट गडी बाद करत काहीसे यश मिळवले. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली आहे.
दुसऱ्या दिवशी जो रूट आणि बेन स्टोक्स या नाबाद जोडीने खेळाची सुरूवात केली. दोघांनी पहिल्या सत्रात ९२ धावांची भर घातली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टोक्सने अर्धशतक तर स्टोक्सने दीडशतक ठोकले. स्टोक्सचा अडथळा नदीमने दूर केला. फटकेबाजीच्या नादात स्कोक्स पुजाराकडे झेल देऊन बसला. त्याने १० चौकार आणि ३ षटकारासह ८२ धावा केल्या. यानंतर ओली पोप आणि रुट जोडीने इंग्लंडला चारशेचा टप्पा पार करून दिला. एक बाजू लावून धरत रुटने शानदार द्विशतक झळकावले.
अश्विनच्या गोलंदाजीवर पोप बाद झाला. त्याने ३४ धावा केल्या. पोप बाद झाल्यानंतर पुढच्या षटकात स्थिरावलेला रुट देखील बाद झाला. त्याला नदीमने पायचित केले. रुटने ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांसह २१८ धावांची खेळी साकारली. रुट बाद झाल्यानंतर इशांत शर्माने एकाच षटकात इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिले. त्याने जोस बटलर (३०) आणि जोफ्रा आर्चर (०) याला क्लिन बोल्ड केले. यानंतर जॅक आणि डोमिनाक या जोडीने नाबाद ३० धावांची भागिदारी केली. यासह इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली आहे.