पुणे -सलामीवीर शिखर धवन (९८), के एल राहुल (नाबाद ६२), कृणाल पांड्या (३१ चेंडूत नाबाद ५८) आणि विराट कोहली (५६) यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने ३१७ धावा करत पाहुण्या इंग्लंड संघासमोर ३१८ धावांचे आव्हान ठेवले आहे. राहुल-कृणाल जोडीने सहाव्या गड्यासाठी ५७ चेंडूत ११२ धावांची नाबाद ताबडतोड खेळी केली. भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१७ धावा केल्या.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने सावध सुरूवात करून दिली. या दोघांनी १५.१ षटकात ६४ धावांची सलामी दिली. बेन स्टोक्सने रोहितला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. रोहितचा (२८) झेल बटलरने टिपला. यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने शतकी भागिदारी रचून संघाला दीडशेपार पोहचवले. या दरम्यान, दोघांनी आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ५६ धावावर असताना विराट मार्क वूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल मोईन अलीने घेतला.
विराट पाठोपाठ श्रेयस अय्यर (६) देखील बाद झाला. त्याला मार्क वूडनेच बाद केलं. एकाबाजूने गडी बाद होत असताना, दुसरी बाजू लावून धरत शिखरने फटकेबाजी केली. पण तो शतकापासून वंचित राहिला. ९८ धावांवर असताना, स्टोक्सने त्याला मॉर्गनकडे झेल देण्यास भाग पाडले. धवनने १०६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ९८ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या (१) स्टोक्सचा शिकार ठरला. त्याचा झेल बेयरस्टोने घेतला. यानंतर राहुल आणि कृणाल या दोघांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताला ३१७ धावांपर्यंत मजल मारून दिली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ५७ चेंडूत ११२ धावांची नाबाद भागिदारी केली. राहुलने ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर कृणाल ५८ धावांवर नाबाद राहिला. यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार खेचले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ३ तर मार्क वूडने २ गडी बाद केले.
हेही वाचा -Ind vs Eng : मायकल वॉनची भविष्यवाणी, म्हणाला 'हा' संघ ३-० ने मालिका जिंकेल
हेही वाचा -ICC Rankings : टी-२०त शेफाली बेस्ट; क्रमवारीत पुन्हा अव्वल