महाराष्ट्र

maharashtra

Women t20 WC : बांगलादेशला १८ धावांनी मात देत भारताने नोंदवला दुसरा विजय

By

Published : Feb 24, 2020, 7:59 PM IST

Updated : Feb 24, 2020, 8:06 PM IST

भारताच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ८ बाद १२४ धावा करता आल्या. फिरकीपटू पूनम यादवने १८ धावांत ३ बळी घेतले.

india vs bangladesh women world cup match result
Women t20 WC : बांगलादेशला १८ धावांनी मात देत भारताने नोंदवला दुसरा विजय

पर्थ - फिरकीपटू पूनम यादवने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला विश्वकरंडक स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला आहे. पर्थच्या वाका स्टेडियमवर भारताने बांगलादेशला १८ धावांनी मात दिली. ३९ धावांची खेळी करणारी भारताची शेफाली वर्मा सामन्याची मानकरी ठरली.

हेही वाचा -VIDEO : 'तुम्हारा वाला खेल पाएगा?'...आयपीएलच्या जाहिरातीत धोनीची थट्टा

भारताच्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकात ८ बाद १२४ धावा करता आल्या.बांगलादेशने शमीमा सुलताना या सलामीवीराला लवकर गमावले. त्यानंतर दुसरी सलामीवीर मुर्शिदा खातूनने प्रतिकार केला. मुर्शिदाने ४ चौकारांच्या जोरावर ३० धावा केल्या. ६१ धावांत ३ गडी बाद झाले असताना यष्टिरक्षक फलंदाज निगर सुलताना धावून आली. तिने ५ चौकारांसह ३५ धावा केल्या. निगर बाद झाल्यानंतर, इतर फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. भारताकडून पूनम यादवने १८ धावांत ३ बळी घेतले. तर, शिखा पांडे आणि अरूंधती रेड्डी यांना प्रत्येकी २ बळी मिळाले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून बांगलादेशने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. युवा सलामीवीर शेफाली वर्माच्या झटपट ३९ आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या ३४ धावांच्या जोरावर भारताने ६ बाद १४२ धावा केल्या. शेफालीसोबत सलामीला आलेली तानिया भाटिया २ धावावंर बाद झाली. त्यानंतर, शेफाली-जेमिमा या जोडीने संघाची कमान आपल्या हाती घेतली. शेफालीने आपल्या खेळीत ४ षटकार आणि २ चौकार लगावले. या दोघी बाद झाल्यानंतर, एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. तळाची फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने ४ चौकारांसह २० धावा संघासाठी जोडल्या. बांगलादेशकडून सलमा खातून आणि पन्ना घोष यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Last Updated : Feb 24, 2020, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details