कोलकाता- भारतामध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश आणि भारतीय संघात हा दिवस-रात्र कसोटी सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या तिकिटांचे दर अत्यंत कमी ठेवले आहेत.
२२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कोलकाताच्या मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा कसोटी सामना, दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने तिकिटाचे दर फारच कमी ठेवले आहेत. या सामन्याचे तिकीट कमीत कमी ५० रुपयांमध्ये मिळू शकते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी ही माहिती दिली.
याविषयी बोलताना दालमिया म्हणाले, 'भारत-बांगलादेश सामन्याला आम्ही २.३० वाजता नाही तर १.३० ला सामना सुरुवात करणार आहोत. ज्यामुळे हा सामना सायंकाळी ८.३० वाजता संपू शकेल. प्रेक्षकांना लवकर घरी जाण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. तसेच या सामन्याचे तिकीट दर ५०, १००, १५० रुपये असे ठेवण्यात आले आहेत.'