नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघामध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. पण, मालिकेतील पहिलाच सामना दिल्लीतील प्रदूषणामुळे होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआयने हा सामना नियोजित वेळापत्रकानूसार होईल, असे स्पष्ट केले आहे.
भारत-बांगलादेश संघामध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या (फिरोज शाह कोटला) अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, ऐन दिवाळीत दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पण प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब असूनही सामना खेळला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
एअर क्वालिटी इंडेक्सनुसार, दिल्ली विद्यापीठात हवेची गुणवत्ता निकृष्ट असल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे २०१७ मध्येही श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता. त्यावेळी देखील, दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच जास्त खालावली होती आणि बरेच श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले होते. सामना संपल्यानंतर काही खेळाडू तर आजारीही पडले होते.