इंदूर -सलामीवीर फलंदाजमयांक अग्रवालच्या दमदार द्विशतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशविरूद्ध ३४३ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. त्रिशतकाकडे कूच करणाऱ्या मयांकला मेहदी हसनने २४३ धावांवर बाद केले. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मयांकने ३३० चेंडूंत २८ चौकार आणि ८ षटकार ठोकले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ६ बाद ४९३ धावा झाल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ६० तर, उमेश यादव २५ धावांवर खेळत होते.
इंदूरच्या होळकर मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने १ बाद ८६ धावांवरून पुढे खेळताना आज भारताने चेतेश्वर पुजाराला लवकर गमावले. संघाच्या १०५ धावा झाल्या असताना गोलंदाज अबू जैदने त्याला ५४ धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार लगावले. पुजारा बाद झाल्यानंतर, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालने भारताच्या डावाला आकार दिला. संघाच्या तीनशे धावा पार झाल्या असताना रहाणे अबू जैदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या १४ धावांनी हुकले. रहाणेने १७२ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांसह ८६ धावा केल्या.
संघाची धावसंख्या चारशेच्या पार गेली असताना मयांक बाद झाला. त्यानंतर आलेला वृद्धिमान साहाही लवकर तंबूत परतला. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने उमेश यादवला साथीला घेत संघाची धावसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचवली. जडेजाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावांची तर, उमेश यादवने १ चौकार आणि ३ षटकारांसह २५ धावांची नाबाद खेळी केली आहे. बांगलादेशकडून गोलंदाज अबू जैदने सर्वाधिक चार बळी तर, मेहदी हसन आणि एबादत हुसेन यांना प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.
हेही वाचा -टीम इंडिया गोलंदाजीत 'हिरो', क्षेत्ररक्षणात ठरली 'झिरो'