इंदूर - होळकर मैदानात रंगलेल्या भारत विरुध्द बांगलादेश संघातील कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १५० धावात रोखले. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने २६ षटकात १ बाद ८६ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (४३) आणि मयांक अग्रवाल (३७) धावांवर नाबाद खेळत आहेत.
बांगलादेशच्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहित सहा धावांवर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
बांगलादेश संघाचा कर्णधार मोमीनूल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मोमीनूलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. उपहारापर्यंत बांगलादेशची अवस्था ३ बाद ६३ अशी झाली होती. अश्विनने त्यात चौथा धक्का देत बांगलादेशची अवस्था ४ बाद ९९ अशी केली. यानंतर लागलेली गळती थांबलीच नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ ५८.३ षटकात १५० धावांवर आटोपला.