मेलबर्न- तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताचा ११ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मराठमोळ्या स्मृती मानधानाने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. स्मृती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन करत विजेतेपदाला गवसणी घातली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अलिसा हिली अवघ्या ४ धावांवर माघारी परतली. तिला दीप्ती शर्माने पहिल्या षटकात बाद केले. त्यानंतर मूनी आणि अॅशलेघ गार्डनर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने गार्डनरला (२६) बाद करत ही जोडी फोडली.
कर्णधार मेन लॅगिंगने तिसऱ्या विकेटसाठी मूनीसह अर्धशतकी भागीदारी केली. लॅनिंगला (२६ ) राधा यादवने बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाला एलिसा पेरी आणि अॅनाबेलच्या रुपाने दोन धक्के बसले.
अखेरीस मूनी एका बाजू पकडून ऑस्ट्रेलियाला १५५ धावांची मजल मारुन दिली. मूनीने ५४ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ७१ धावांची खेळी केली. तिला हायसेनने १८ धावा करत चांगली साथ दिली. भारतकडून दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर अरुंधती रेड्डी, राधा यादव यांनी प्रत्येकी १-१- गडी बाद केला.