सिडनी - ऑस्ट्रेलियाने दिलेले ४०७ धावांचे मोठे लक्ष्य आणि दुखापतीने त्रस्त असलेल्या भारतीय संघाने तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने तब्बल २५९ चेंडू खेळून काढत कसोटी अनिर्णीत राखली आणि मालिका १-१ बरोबरीत ठेवली. उभय संघातील अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे.
विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची अभेद्य भागिदारी रचली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली. विहारीने १६१ चेंडूचा तर अश्विनने १२८ चेंडूचा सामना केला. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीने संयमी आणि चिवट फलंदाजी करत भारताचा पराभव टाळला.
आज अखेरच्या पाचव्या दिवशी अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने खेळाला सुरूवात केली. तेव्हा नॅथन लिओनने रहाणेला बाद करत भारताला जबर धक्का दिला. यानंतर बढती मिळालेल्या ऋषभ पंतने सुरूवातीला सावध खेळ केला. पण जम बसल्यानंतर त्याने, फटकेबाजी केली. तो ९७ धावांवर बाद झाला. त्यानंतर काही वेळाने पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.