मुंबई- ऑस्ट्रेलिया संघाने मुंबईत खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा १० गडी राखून पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा भारतीय संघ ४९.१ षटकात सर्वबाद २५५ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाने भारताचे लक्ष्य बिनबाद आणि ७४ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (१२८) आणि फिंच (११०) यांनी नाबाद शतकं झळकावली. दरम्यान, भारताच्या या लाजिरवाण्या पराभवात कोणते खेळाडू 'खलनायक' ठरले वाचा...
विराट कोहली -
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमात बदल केला. त्याने रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांना अंतिम संघात स्थान दिले. तो स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. या सामन्यात त्याला १६ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झंम्पाने त्याला माघारी धाडले.
श्रेयस अय्यर -
चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात असलेला श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला. त्याने टी-२० सामन्यात चमकदार कामगिरी केली. मात्र, एकदिवसीय सामन्यात त्यांची 'टांय-टांय फिस..' झाली. या सामन्यात तो पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला आणि त्याला फक्त ४ धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने त्याला बाद केले.