मेलबर्न - या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळू शकते. ज्या स्टेडियमची आसनक्षमता 40 हजार आहे, अशा स्टेडियममध्ये 10 हजार प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आपल्या संकेतस्थळावरील अधिकृत निवेदनात म्हटले आहे, "40 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मैदानी स्थळांना तिसऱ्या टप्प्यात 25 टक्क्यांपेक्षा जास्त तिकीट आणि प्रेक्षक ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही."
निवेदनानुसार, 40 हजारापेक्षा जास्त क्षमतेच्या मैदानांना कार्यक्रमासाठी परवानगी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या स्टेडियममधील प्रेक्षकांचे व्यवस्थापन संबंधित राज्य करतील. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि प्रादेशिक नेत्यांसह मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मॉरिसनसमवेत मुख्य वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते.