राजकोट -वानखेडेवरील मानहानिकारक पराभवानंतर, टीम इंडिया आता पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवारी) दुसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे रंगणार आहे. हा सामना दुपारी १.३० वाजता सुरू होईल.
हेही वाचा -बीसीसीआयच्या करार यादीतून धोनीचे नाव 'कटाप'
पहिल्या सामन्यात पाहुण्यांनी भारताला दहा गड्यांनी मात दिली. चौथ्या क्रमांकावर उतरण्याची कर्णधार विराट कोहलीची योजना मुंबईत अयशस्वी ठरली. त्यामुळे राजकोटला होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालिकेतील आव्हान टिकवण्याच्या निर्धाराने कोहली त्याच्या नियमित तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकेल. सचिन तेंडुलकरच्या मायदेशात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी कोहलीला एका शतकाची आवश्यकता आहे.
रिषभ पंतला दुखापत झाल्यामुळे यष्टिरक्षणाची जबाबदारी राहुलकडे सोपवली जाणार आहे. तसेच मंगळवारी मुंबईत झालेल्या सामन्यात गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही, त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.