सिडनी - जागतिक क्रिकेटमध्ये 'मातब्बर संघ' असे विशेषण असलेल्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभवाचा जबर धक्का सहन करावा लागला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी 'फेल' मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे शिलेदार भारतासमोर मोठ्या धावसंख्येचा बुरूज उभारू शकले. हा बुरूज भेदणे भारताला कठीण गेले. आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. सिडनीच्या ओव्हल मैदानावर आज रविवारी, (२९ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) उभय संघात दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होईल.
आजच्या सामन्यात विजय नोंदवून मालिका जिंकण्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाचे असेल. तर, मागील सामन्याच्या चुका मागे ठेवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारत सज्ज असेल. आयपीएलची लय बाजूला सारून एकदिवसीय क्रिकेटच्या स्वरुपाचा अवलंब करणे, हे भारतापुढे आव्हान असेल.
गोलंदाजांच्या फळीत विराट कोणता बदल करणार?
पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला होता. नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा या गोलंदाजांच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांची लयलूट केली. पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरलेल्या विराटसेनेला आपली रणनिती बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत अनेक क्रीडापंडितांनी दिले आहे. त्यामुळे गोलंदाजांच्या फळीत विराट कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, आयपीएलमध्ये लक्ष वेधून घेतलेला गोलंदाज टी. नटराजन या सामन्यात खेळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्टार फलंदाजांकडे लक्ष -
टीम इंडियाकडे तळापर्यंत चांगले फलंदाज आहेत. सलामीवीर मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, विराट कोहली हे स्टार फलंदाज पहिल्या सामन्यात अपयशी ठरले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी केली. आता तोच फॉर्म या सामन्यातही कायम राखण्याकडे त्यांचे लक्ष असेल.