सिडनी -भारताविरुद्ध रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या ३९० धावांचे आव्हान भारताला पेलवले नाही. विराट कोहली, लोकेश राहुल यांनी झुंज दिली असली, तरी त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी सलग दुसरे शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकात ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभारला. स्टीव्ह स्मिथने आपला झंझावाती फॉर्म कायम राखत सलग दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी ५८ धावांची सलामी दिली. जोश हेझलवुडने शिखर धवनला ३० धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. दोन धावांच्या अंतराने मयंकही (२८) बाद झाला. त्याला कमिन्सने अॅलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले.
विराट-राहुलचे प्रयत्न व्यर्थ -
त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची धावगती वाढवली. हे दोघे मोठी भागिदारी करणार असे वाटताना मोइसेस हेन्रिक्सने अय्यरला ३८ धावांवर बाद केले. त्यानंतर विराटने लोकेश राहुलला हाताशी घेत आव्हानाकडे कूच केली. शतकाला अकरा धावा बाकी असताना विराट बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याला जोश हेझलवुडने बाद केले. तर, लोकेश राहुलने ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळण्याच्या नादात राहुल झम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाला. या दोघानंतर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने झुंज दिली. मात्र, चेंडू आणि आवश्यक धावांचे अंतर वाढल्याने भारताला पराभव पत्करावा लागला. यजमान संघाकडून पॅट कमिन्सला ६७ धावांत ३, हेझलवुड आणि झम्पा यांनी प्रत्येकी २ आणि हेन्रिक्स आणि मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
वॉर्नर-फिंचची यशस्वी सुरुवात -