रांची- भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना रांची येथे होत आहे. पहिल्या सामन्यात ६ गड्यांनी तर, दुसऱ्या सामन्यात ८ धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवत भारताचा मालिका विजयाचा निर्धार असणार आहे. तर, ऑस्ट्रेलिया आजच्या सामन्यात विजय मिळवून पुनरागमन करण्याचा तयारीत असेल.
भारतीय संघ फॉर्मात असून पहिल्या सामन्यात केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने १४१ धावांची भागीदारी करताना कठीण परिस्थितीतून भारताला सामना जिंकून दिला होता. दुसऱया सामन्यात विराट कोहलीचे शतक आणि विजय शंकरच्या अष्टपैलू खेळाने भारताचा विजय झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ९० धावांची खेळी सोडल्यास रायुडुच्या प्रदर्शनात सातत्य नाही. त्यामुळे त्याच्या जागी आज केएल राहुलला संघात घेतले जाण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱया धोनीवर सर्वांच्या नजरा असतील. धोनीचा घरच्या मैदानावर कदाचित हा शेवटचा सामना ठरू शकतो. भारतीय संघ धोनीला विजयी भेट देण्याचा प्रयत्न करेल. रांची मध्ये धोनीने आतापर्यंत ३ एकदिवसीय सामने खेळताना फक्त २१ धावा केल्या आहेत. त्यामुळे आज चाहत्यांनाही धोनीकडून धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा असेल.