मुंबई- ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी, भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सरावादरम्यान, जखमी झाला आहे. जर रोहितची दुखापत गंभीर असल्यास भारतासाठी हा मोठा झटका असेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. सामन्याआधी नेट प्रॅक्टिस करत असताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सराव सोडून विश्रांती करावी लागली.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सलामीवीर रोहित शर्मा मुंबईत सराव करत होता. तेव्हा चेंडू त्याच्या उजव्या अंगठ्याला लागला. त्यानंतर फिजिओ नितीन पटेल यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पण, त्यांच्या पुढील उपचाराबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.