मुंबई -सलामी जोडी डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी केलेल्या दमदार शतकांमुळे पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताला सहज नमवले. वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता ३७.४ षटकातच पूर्ण केले.
हेही वाचा -वानखेडेवर वॉर्नरचा मोठा पराक्रम, ५००० धावा ठोकणारा ठरला वेगवान फलंदाज
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नर आणि फिंचच्या जोडीने भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून आक्रमण केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या जोडीपुढे गुडघे टेकले. वॉर्नरने आपल्या १७ चौकार आणि ३ षटकारांसह १२८ तर, कर्णधार फिंचने १३ चौकार आणि २ षटकारांसह ११० धावांची नाबाद खेळी रचली.वॉर्नरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला २५५ धावावंर रोखले. भारतीय संघात रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन तीनही सलामीवीरांना अंतिम ११ मध्ये संधी मिळाली. रोहित आणि शिखरने भारतीय डावाची सुरुवात केली. घरच्या मैदानावर सलामीवीर रोहित शर्मा १० धावांवर माघारी परतला. मात्र, डावखुरा फलंदाज शिखर धवन आणि फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलने डाव सांभाळल्यामुळे भारताला अडीचशेचा टप्पा गाठता आला. ४७ धावांवर असताना अगरने राहुलला बाद केले. राहुलने आपल्या खेळीत ४ चौकार लगावले.
राहुलपाठोपाठ ९ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावांची खेळी करून धवनही तंबूत परतला. कमिन्सने अगरकडे झेल देत त्याला बाद केले. कर्णधार कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने निराश केले. फिरकीपटू अॅडम झाम्पाने त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. ३१.२ षटकात भारताच्या ४ बाद १५६ धावा असताना रिषभ पंत मैदानात आला. त्याने जडेजासोबत छोटेखानी भागिदारी रचली. भारत दोनशे पार झाल्यानंतर जडेजा २५, तर पंत २८ धावांवर माघारी परतला. शेवटी आलेल्या मोहम्मद शमी (१०) आणि कुलदीप यादवने (१७) प्रतिकार करत बहुमूल्य धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक तीन, कमिन्स आणि रिचर्ड्सनने दोन, तर झम्पाने एक बळी टिपला.