सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया-अ संघातील दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात बेन मॅकडर्मोट (107) आणि जॅक वाइल्डरमुथ (111) यांनी नाबाद शतक झळकावले.
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण एकवेळ भारताची अवस्था 9 बाद 123 अशी झाली होती. तेव्हा जसप्रीत बुमराहने जबरदस्त अर्धशतक ठोकत संघाला 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून एकूण 20 विकेट पडल्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलिया-अ संघाला बॅकफूटवर ढकलले.
पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर शुभमन गिल, मयांक अग्रवाल यांनी अर्धशतक ठोकले, तर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी दुसऱ्या दिवशी शतकी खेळीनंतर नाबाद परतले. विहारीने नाबाद 104 तर पंतने नाबाद 103 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने 386-4 धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे 473 धावांचे तगडे आव्हान ठेवले.