ब्रिस्बेन - मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या प्रभावी माऱ्यासमोर, ऑस्ट्रेलियाचा निभाव लागला नाही. ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने बिनबाद ४ अशी सावध सुरूवात केली होती. तेव्हा पावसाने मैदानात हजेरी लावली. यामुळे उर्वरित खेळ होऊ शकला नाही. रोहित शर्मा ४ तर शुबमन गिल शून्यावर नाबाद आहे. उभय संघातील मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने आक्रमक पावित्रा घेतला. डावखुरा डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. शार्दुलने हॅरिसला (३८) एका उसळत्या चेंडूवर पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर सुंदरने पुढच्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने ४८ धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी रचली.
ऑस्ट्रेलियाची अवस्था २४ षटकात बिनबाद ८८ वरून दोन बाद ९१ अशी झाली. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात धोकादायक मार्नस लाबुशेन (२५) आणि मॅथ्यू वेड (०) यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने ३५ षटकात ३.६८ च्या जबरदस्त सरासरीने १२८ धावा चोपल्या. भारतीय गोलंदाजांनीही चार बळी घेत सामन्यात पुनरागमन केले.
दुसऱ्या सत्रात स्टिव्ह स्मिथने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर सिराजने स्मिथचा झेल सोडला. पण, याची भरपाई त्याने अप्रतिम चेंडू टाकून स्मिथला (५५) बाद करत केली. यानंतर शार्दुल ठाकूरने कॅमेरून ग्रीनला (३७) बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ठाकूरच्या गोलंदाजीवर ग्रीन रोहित शर्माच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ काही काळ थांबला होता. त्यानंतर शार्दुल व सिराज यांनी ऑस्ट्रेलियाला धक्का देण्याचे सत्र कायम ठेवले. पॅट कमिन्स एकाबाजूने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढवली. भारताकडून मोहम्मद सिराजने ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलने ४ गड्यांना माघारी धाडले. सुंदरला एक विकेट मिळाली.
दरम्यान, गाबाच्या मैदानाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचे आव्हान एकदाही कोणत्याही संघाला पार करता आलेले नाही. इतकेच नव्हे तर मागील १०० वर्षांत ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात एकदाही पराभूत झालेला नाही.