ब्रिस्बेन - भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी युवा सलामीवीर शुबमन गिलच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या जोरावर उपहारापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यात ८३ धावा केल्या आहेत. अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी रोहित शर्माला पॅट कमिन्सने टिम पेनकरवी झेलबाद केले. यानंतर सामन्याची सुत्रं शुबमनने आपल्या हाती घेत नाबाद अर्धशतक झळकावले. अनुभवी चेतेश्वर पुजाराने संयमी फलंदाजी करत शुबमन गिलला चांगली साथ दिली.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पॅट कमिन्सने रोहित शर्माची विकेट घेतली. रोहितने ७ धावा केल्या. त्याचा झेल टिम पेनने टिपला. यानंतर गिल आणि पुजारा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला आहे. यादरम्यान, शुबमनने कारकिर्दीतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. दुसरीकडे पुजाराने ८९ चेंडूचा सामना करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले.