ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात आघाडीचे सहा फलंदाज १८६ धावांवर माघारी परतले. तेव्हा भारतीय संघ १८३ धावांनी पिछाडीवर होता. अशा कठीण स्थितीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागिदारी रचली. याच भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत ३३ धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा (२५) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (३७) पहिल्या सत्रात बाद झाले. त्यानंतर पंत आणि मयांक अगरवाल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश ठरले. ऋषभ पंत २३ तर मयांक अगरवाल ३८ धावांवर बाद झाला. भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी झाली. तेव्हा भारतीय संघ २०० धावांपर्यंत मजल मारेल का? अशी शंका प्रत्येकाच्या मनात होती. पण पदार्पण करणारा सुंदर आणि दुसरा सामना खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरने जबाबदारीने फलंदाजी केली. दोघांनी सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागिदारी करत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली.