सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील ९४ धावांची आघाडी मिळून भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे (९) अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (४) नाबाद खेळत आहेत. भारतीय संघाला विजयासाठी आणखी ३०९ धावांची गरज आहे.
चौथा दिवस ऑस्ट्रेलिया संघाचा ठरला. त्यांनी आपला दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला आणि भारतीय संघाला ४०७ धावांचे आव्हान मिळाले. भारताची सलामीवीर जोडी शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी आश्वासक सुरूवात केली. दोघांनी ७१ धावांची भागिदारी केली. हेझलवूडच्या अप्रतिम चेंडूवर शुबमन गिल टिम पेनकडे झेल देऊन बाद झाला. त्याने ३१ धावांची खेळी केली. यानंतर एक बाजूने रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. पॅट कमिन्सने त्याला साफळा रचत बाद केले. कमिन्सच्या चेंडू उंच टोलावण्याच्या नादात रोहित स्टार्ककडे झेल देऊन बसला. रोहितने ५२ धावा केल्या. यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने किल्ला लढवला.
चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ बाद ९८ धावा केल्या आहेत. अजिंक्य आणि पुजारा नाबाद खेळत आहेत. उद्या (सोमवार) सामन्याचा अखेरचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी ८ विकेटची गरज आहे. तर भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी ३०९ धावांची गरज आहे. याशिवाय हा सामना ड्रा देखील होऊ शकतो.