मुंबई - अॅडलेड कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून शानदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून धूळ चारली आणि चार सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, या सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतूक सर्व स्तरातून होत आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही रहाणेसह भारतीय संघाचे कौतूक केले.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर
'विराट कोहली, रोहित शर्मा, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय विजय मिळवला, म्हणजे हे खूप मोठे यश आहे. ०-१ अशा पिछाडीनंतर भारतीय संघाने दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे कौतुक, अशा आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.
काय म्हणाला विराट कोहली
संघातील प्रत्येक खेळाडूने विजयासाठी स्वतःला झोकून दिले. टीमसाठी आणि विशेषतः अजिंक्यसाठी खूप आनंद होत आहे. त्याने संघाचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळले, असे विराटने म्हटलं आहे.