राजकोट - टीम इंडियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत, ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धूळ चारली. भारताने राजकोट येथे खेळवण्यात आलेला सामना ३६ धावांनी जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने संघाच्या पराभवाचे कारण सांगितले.
सामना संपल्यानंतर बोलताना फिंचने सांगितले की, 'आम्हाला सुरुवातीला विकेटची गरज होती. तेव्हा आम्हाला विकेट मिळवता आली नाही. भारताच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर आम्ही फलंदाजीत, नेट रनरेट राखण्यात अपयशी ठरलो.'
स्मिथ आणि लाबुशेनने चांगला खेळ केला. पण नेट रनरेट वाढल्याने, दबाब वाढत गेला आणि हेच आमच्या पराभवचे कारण ठरल्याचे फिंच म्हणाला. भारतीय संघाने या सामन्यात चांगला खेळ केला असल्याची कबुलीही फिंचने दिली.
भारताने विजयासाठी दिलेल्या ३४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताला चांगलेच झुंजवले. तेव्हा मोक्याच्या क्षणी कुलदीप आणि शमीने एकाच षटकात दोन बळी घेत कांगारुंना बॅकफूटवर ढकलले. यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ ३०४ धावांपर्यंतच माजल मारु शकला.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने मुंबईतील पहिला सामना १० गड्यांनी जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. तेव्हा टीम इंडियाने राजकोटचा सामना ३६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. अखेरचा निर्णायक सामना बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये १९ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा -IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील ५ खास विक्रम, वाचा एका क्लिकवर...
हेही वाचा -Ind vs Aus : अॅडम झंम्पा विराटसाठी डोकेदुखी, वाचा किती वेळा केलं बाद