नवी दिल्ली - युवा खेळाडू यशस्वी जयस्वालने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर १९ वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात यशस्वीने 89 धावांच्या खेळीसोबत चार बळीही टिपले.
हेही वाचा -टिम पेनची चपळाई, 'धोनी स्टाईल' स्टम्पिंगने फलंदाजाला धाडलं माघारी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा डाव २९.५ षटकात ११९ धावांवरच संपुष्टात आला. दक्षिण अफ्रिकेकडून जोनाथन बर्डने सर्वाधिक २५ धावा केल्या. यशस्वीने चार तर, आकाश सिंग, अथर्व अंकोलेकर आणि रवि बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्ग शून्यावर बाद झाला. त्यानंतर, शाश्वत रावतही २ धावा करून बाद झाला. यशस्वीने त्यानंतर, ध्रुव जुरेलला साथीला घेत भारताच्या संघाची कमान सांभाळली. यशस्वीने ५६ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या आणि भारताला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला.