मुंबई - नुकत्याच झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला बांगलादेशकडून मात खावी लागली. भारताचे तब्बल पाचव्यांदा जगज्जेतेपद मिळवण्याचे स्वप्न धूळीस मिळाले असले, तरी या संघातील अनेक युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूंपैकीच एक म्हणजे सलामीवीर डावखुरा फलंदाज तिलक वर्मा. दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेनंतर, भारतीय संघ घरी परतला असून ईटीव्ही भारतने तिलक वर्माशी खास बातचीत केली. तिलकचा हा क्रिकेटप्रवास त्याच्या आई-वडीलांनी आणि त्याच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी उलगडला आहे.
हेही वाचा -टीम इंडियाची न्यूझीलंड भ्रमंती, 'या' खेळाडूने शेअर केले अनुष्कासोबतचे फोटो
कुटुंब आणि प्रशिक्षकांच्या अपेक्षांचे ओझे तू कसे हाताळतो असे विचारल्यानंतर तिलकने कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. 'खूप काळ क्रिकेट खेळत असल्याने कोणताही दबाव नाही. मूलभूत गोष्टींवर लक्ष ठेवतो. काही अडचण असेल तर प्रशिक्षकांशी संपर्क साधतो. या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे माझे स्वप्न होते', असे तिलकने ईटीव्ही भारतला सांगितले.
हैदराबादचा रहिवासी असलेला तिलकच्या मेहनतीचे कौतुक सर्वत्र होत आहे. त्याचे प्रशिक्षक सालम बयाश यांनी त्याच्या मेनतीच्या आठवणींना उजाळा दिला. '१७ वर्षीय तिलकने वयाच्या नऊ वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरू केले. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिलक क्रिकेटचा सराव करायचा. या दरम्यान तो फक्त दोनच तास आराम करायचा. तो जेव्हा शिबीरासाठी आला होता. तेव्हापासून तो चांगला क्रिकेट खेळायचा. त्याच्या आईवडिलांना मी तिलकला अकादमीत पाठवण्यासाठी सांगितले होते', असे बयाश यांनी सांगितले.
तिलक आणि त्याचे प्रशिक्षक सालम बयाश तिलकच्या आईवडिलांनी त्याच्या मस्तीखोर स्वभावाबद्दल सांगितले. 'मुले नेहमी मस्ती करतात. मात्र, तिलक मोठा झाल्यापासून त्याने हा स्वभाव कमी केला आहे. देशासाठी खेळत असल्याने आम्ही खूप आनंदी आहोत', असे तिलकची आई गायत्री यांनी सांगितले. तर, 'भारताच्या 'अ' संघाकडून खेळतोय आणि या विश्वकरंडक स्पर्धेतही खेळला. आमचे नातेवाईक त्याला-आम्हाला फोन करून शुभेच्छा देतात', असे तिलकचे वडील नागराज यांनी सांगितले आहे.
तिलकचा भाऊ तरुण वर्मा राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू असून त्यानेही भावाबद्दल खूप आनंदी असल्याचेही सांगितले. त्यांच्या मित्रांनाही तिलकला भेटायचे असल्याचे तरुणने सांगितले आहे.