मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ तिथूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण यात तीन प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा, कसोटीतील अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा आणि मर्यादित षटकाच्या सामन्याचा स्पेशालिस्ट भुवनेश्वर कुमार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघासोबत नाहीत. हे तिघेही आयपीएल स्पर्धेदरम्यान, दुखापतग्रस्त झाले आहे. यामुळे त्यांची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी करण्यात आलेली नाही. पण हे खेळाडू भारतीय संघासाठी महत्वपूर्ण असून त्यांची अनुपस्थिती टीम इंडियासाठी अडचणीची ठरू शकते.
रोहित शर्मा -
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात १८ ऑक्टोबरला खेळताना दुखापत झाली. यामुळे त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी करण्यात आलेली नाही. पण, बीसीसीआय रोहितच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहे.
भुवनेश्वर कुमार -
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या भुवनेश्वर कुमारला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता. पण भुवी या सामन्यात अखेरच्या षटकादरम्यान, दुखापतग्रस्त झाला. त्याची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आणि तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला.
इशांत शर्मा -
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सात ऑक्टोबरला सराव सत्रात दुखापत झाली. यानंतर तपासणीत त्याच्या पायाचे स्नायू दुखावल्याचे दिसून आले. यामुळे तो देखील आयपीएलमधून बाहेर पडला.
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा -
आयपीएल २०२० स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज.
- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.