नवी दिल्ली - भारत आणि बांगलादेश संघात ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना २२ नोव्हेंबर पासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स रंगणार असून खेळाडूंसह चाहत्यामध्ये या सामन्याबाबत उत्सुकता आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांची तिकिटे विकली गेली असल्याचे, बीसीसीआयने नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमिवर दिवस-रात्र कसोटी आणि पारंपरिक सामन्यातील फरक तसेच नियमावली काय आहे ते वाचा...
पारंपरिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जातात. मात्र, दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. हा बदल रात्री फलंदाजांना प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून करण्यात आला आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सर्व दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत.
इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच दिवस-रात्र कसोटीमध्ये ८० षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि ९० षटकांच्या खेळाचे नियोजन असते. पारंपरिक कसोटीत अंधूक प्रकाशामुळे पंच सामना थांबवू शकतात. मात्र दिवस-रात्र कसोटीत सामना प्रकाशामुळे थांबविला जात नाही.
पारंपरिक कसोटीत दोन ब्रेक असतात. पहिला उपहार आणि दुसरा चहापान. असेच दोन ब्रेक दिवस-रात्र कसोटीतही असतात. मात्र, या दोन्ही ब्रेकच्या वेळा मात्र वेगवेगळ्या आहेत.
पारंपरिक कसोटीत पहिला ब्रेक ४० मिनिटाचा असतो. त्याला उपहार असे म्हटले जाते. मात्र, दिवस-रात्र कसोटीत पहिला ब्रेक २० मिनिटाचा असतो. त्याला चहापान असे म्हटले जाते.