पुणे - भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. तर सलामीवीर शिखर धवन (६७) आणि हार्दिक पंड्या (६४) यांनी वैयक्तिक अर्धशतक ठोकले. भारतीय संघ ४८.२ षटकात ३२९ धावांवर ऑलआउट झाला.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी १०३ धावांची सलामी दिली. इंग्लंडच्या आदिल रशीदने रोहित शर्माला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने ३७ चेंडूत ६ चौकारांसह ३७ धावा केल्या. रोहितनंतर आदिल रशीदने शिखर धवनला देखील बाद केले. शिखरने ५६ चेंडूत १० चौकारांसह ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीला (७) मोईन अलीने क्लीन बोल्ड केले.
भारताने तीन गडी १८ धावांत गमावले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत ३६ षटकात भारताला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान, दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. सॅम कुरेन याने पंतला बाद करत ही जोडी फोडली. पंतने ६२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. त्याचा झेल यष्टीरक्षक बटलरने टिपला. यानंतर बेन स्टोक्सने हार्दिकला क्लीन बोल्ड करत भारताला जबर धक्का दिला. हार्दिकने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारासह ६४ धावांची खेळी केली.